सभापती मनोगत..

sindhutai.jpeg

सभापती मनोगत..

आपल्या सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीचा सन 2024-25 या वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करतांना मला आनंद होत आहे. बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळाने दि.15/05/2025 रोजी माझी सभापती म्हणुन निवड करुन माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे.

त्यानुसार दि.15/05/2025 पासुन मी सभापती म्हणुन बाजार समितीचे कामकाज सुरु केले असुन बाजार समितीची, शेतक-यांची व बाजार घटकांची प्रगती व्हावी, या एकमेव उद्देशाने मी व माझे सहकारी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शेतकरी हित नजरेसमोर ठेवत शेतक-यांच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर प्रथम येईल त्या प्राधान्याने त्याच दिवशी लिलाव, चोख वजनमाप व तात्काळ रोख रक्कम घेऊन घरी जाता यावे, या पद्धतीने कामकाज सुरु आहे. यात व्यापारी वर्गाचा देखील महत्वाचा सहभाग असुन दैनंदिन माल विक्रीनंतर व्यापारी वर्गामार्फत माल विक्रेत्यांना तात्काळ रोख स्वरुपात रक्कम अदा केली जाते. त्यामुळे तालुक्यातील, तालुक्याबाहेरील, तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकरी सटाणा बाजार समितीत शेतीमाल विक्रीस प्रथम पसंती देत आहेत.

तसेच बाजार समितीचे सटाणा मुख्य बाजार आवारात कांदा, भुसार व डाळिंबचे दैनंदिन लिलाव सुरु असुन उपबाजार डांगसौंदाणे येथे दैनंदिन कांदा व मका लिलाव सुरु असून लवकरच भाजीपाला व जनावरे बाजार चालू करण्याचा मानस आहे.

  • बाजार समितीचे आवाराची नियमित साफसफाई केली जाते.
  • बाजार समितीचे मुख्य बाजार आवारावर बाजार घटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजार आवारात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.
  • शेतीमाल विक्री व्यवस्थेत पारदर्शकता येऊन बाजार समितीतील आवक, बाजारभाव, किती शेतीमालाचे लिलाव झाले, किती बाकी आहेत, याबाबतची माहिती संकेतस्थळावर मिळु शकणार आहे. तसेच शेतक-यांनी बाजार समितीत किती शेतीमाल विक्री केला याबाबतची माहिती ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.
  • मुख्य बाजार आवार सटाणा येथे शेतकरी व बाजार घटकांसाठी 1000 लि. क्षमतेचे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आर.ओ.फिल्टर प्लॅनट बसविण्यात आलेला आहे.
  • शेतकरी निवासात शेतकरी बांधवांसाठी वातानुकुलित व्यवस्था करण्यात आली आहे.
  • बाजार घटकांसाठी व आरोग्याच्या दृष्टीने बाजार समितीतील मुख्य कार्यालयालगत स्वच्छतागृह अद्यावत करण्यात आले आहे.

बाजार समितीचे व्यावहारिक दृष्टीकोन समोर ठेवून व शेतकरी हितास प्राधान्य देऊन शेतकरी, व्यापारी व कामगार यांना केंद्रबिंदु मानुन त्यांना बाजार आवारात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे संचालक मंडळाने नियोजन व निर्धार केलेला आहे. बाजार समितीचे कामकाज अधिक सक्षम व पारदर्शी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्व सहकारी संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल, सभासद, सेवक वर्ग व अन्य सर्व हितचिंतक, तसेच विविध क्षेत्रातील राजकिय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, जेष्ठ नेते, पत्रकार बंधु, विविध खात्याचे अधिकारी आदिंचे सहकार्य लाभत आहे. भविष्यात देखील आपणा सर्वांचे असेच अनमोल सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करते व सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानुन माझे मनोगत पुर्ण करते.

सौ. सिंधूबाई संजय सोनवणे

सभापती

कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा

ता. बागलाण जि. नाशिक